गर्दीच्या वेळेत झाडू मारण्याचा अजब प्रकार; बसस्थानकातील धुळीने प्रवासी त्रस्त.
अमळनेर/आबिद शेख.
अमळनेर: शहरातील बसस्थानकाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी असताना साफसफाई कर्मचारी झाडू मारत असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असून, धुळीमुळे अनेक प्रवाशांना जागा बदलून इकडे-तिकडे फिरावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संध्याकाळच्या वेळी बसस्थानकात विविध मार्गांवरील बसची प्रतीक्षा करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित असतात. याच वेळी आवारात कोरड्या पद्धतीने झाडू मारण्यात येत असल्याने हवेत धुळीचे लोट निर्माण होतात. त्यामुळे प्रवाशांच्या नाकातोंडात धूळ जाण्याबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बसस्थानकाची स्वच्छता राखणे आवश्यक असले तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने साफसफाई करण्याची मागणी होत आहे. झाडू मारण्यापूर्वी पाण्याचा हलका वापर करावा किंवा प्रवाशांची गर्दी कमी असलेल्या वेळेत साफसफाई करावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
बस आगार व्यवस्थापकांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन योग्य त्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना द्याव्यात आणि प्रवाशांना धुळीचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी प्रवासी बांधवांकडून होत आहे.

