महाकवी कालिदासांच्या साहित्याचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी : दिनेश नाईक.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : महाकवी कालिदास यांच्या साहित्याने भारतीय संस्कृत वाङ्मय समृद्ध केले असून ‘मेघदूत’ हे त्यांच्या विलक्षण प्रतिभेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन साहित्य भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश नाईक यांनी केले.
सावित्रीबाई फुले महाविद्यालयात महाकवी कालिदास दिनानिमित्त “महाकवी कालिदास : जीवन व कार्य” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. कोळी होते. साहित्य भारती अमळनेर शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनेश नाईक यांनी कालिदास यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना सांगितले की, कठोर साधना, अफाट ज्ञान आणि अद्वितीय कल्पनाशक्तीच्या बळावर त्यांनी संस्कृत साहित्यात अजरामर साहित्यनिर्मिती केली. त्यांच्या साहित्यामध्ये निसर्ग, प्रेम, मानवी भावना, समाजजीवन आणि सौंदर्य यांचे प्रभावी चित्रण आढळते. मेघदूत, रघुवंश, कुमारसंभव यांसारख्या रचनांमधून त्यांच्या साहित्यवैभवाची प्रचिती येते. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच विविध विषयांचे वाचन करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक साहित्य भारती अमळनेर शाखेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र सोनवणे यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य पी. एम. कोळी यांनी अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेसह वाचन, लेखन आणि संवाद कौशल्यांचा विकास होतो, असे सांगून विद्यार्थ्यांनी साहित्य वाचनाची सवय जोपासावी, असेआवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील वाघ यांनी मानले. यावेळी साहित्य भारतीचे विवेक जोशी, मंगेश काळकर, सारंग गर्गे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थउपस्थितहोते.
