अपघातग्रस्तांसाठी लायन्स क्लबचा मदतीचा हात; अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर व फर्स्ट एड किट भेट.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर  : रस्ते अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना ‘सुवर्णक्षणात’ तातडीची मदत मिळावी आणि अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने लायन्स क्लब, अमळनेरच्या वतीने शहर पोलीस ठाण्यातस दोन फोल्डेबल स्ट्रेचर आणि दोन फर्स्ट एड किट बॉक्स भेट देण्यात आले. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉन्सेप्ट’ उपक्रमाला या माध्यमातून मोलाची साथ देण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हे साहित्य पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. हे स्ट्रेचर आणि प्रथमोपचार साहित्य शहर पोलीस ठाण्याच्या दोन्ही शासकीय वाहनांमध्ये ठेवण्यात आले असून, अपघातस्थळी जखमींना सुरक्षितपणे हलविणे आणि तातडीचे प्रथमोपचार देणे अधिक सोपे होणार आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अपघातग्रस्तांना मदत करताना स्ट्रेचर आणि प्रथमोपचार साहित्याची आवश्यकता असल्याची बाब लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार सामाजिक बांधिलकी जपत क्लबने आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी वेळेत मिळणारी मदत अनेकांचे प्राण वाचवू शकते, असे सांगत लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed