जुना बसस्थानक परिसरातून चोरीच्या पल्सरसह तरुण ताब्यात; अमळनेर पोलिसांची कारवाई.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत जुना बसस्थानक परिसरातून चोरीच्या बजाज पल्सर मोटारसायकलसह एका २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. ही मोटारसायकल जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून संशयितास पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


१६ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकडीज, पोहेका मिलिंद सोनार, सुनील तेली, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे व विनोद संदानशिव हे शहरात गस्त घालत असताना जुना बसस्थानक परिसरात एक व्यक्ती चोरीच्या मोटारसायकलसह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली बजाज पल्सर (क्रमांक MH-19 EC-6846) या मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला अडवून चौकशी केली. त्याच्याकडे वाहनाची कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशीत सदर मोटारसायकल जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली मिळाली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed