माजी आमदार साहेबराव पाटील यांची श्रीसंत सखाराम महाराज तीर्थक्षेत्रासाठी २०० कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्याची मागणी.

0

अमळनेर /आबिद शेख.   

अमळनेर: प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेर येथील श्रीसंत सखाराम महाराज समाधी स्थळ व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सन २०१४-१५ मध्ये प्रस्तावित ५० कोटी रुपयांच्या प्रलंबित विकास आराखड्याऐवजी सन २०२५-२६ च्या दरसूचीनुसार तब्बल २०० कोटी रुपयांचा नवीन विकास आराखडा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार तथा कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

साहेबराव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, श्रीसंत सखाराम महाराजांचे तीर्थक्षेत्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून अमळनेरला “प्रतिपंढरपूर” म्हणून विशेष ओळख आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, तीर्थक्षेत्र परिसरात आवश्यक नागरी मूलभूत सुविधा, रस्ते, पार्किंग, स्वच्छता, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, सुशोभीकरण आणि इतर विकासकामांची आवश्यकता असून यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.


निवेदनात त्यांनी नमूद केले की, सन २०१४-१५ च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या विकास आराखड्याचा उल्लेख केला होता. तसेच सन २०१९-२०२० च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीसंत सखाराम महाराजांसह राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली होती. मात्र, हा आराखडा अद्याप प्रत्यक्षात मंजूर होऊन कामाला सुरुवात झालेली नाही.
या संदर्भात २०१४ पासून नियोजन विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यासंबंधी विविध पत्रे, शासन निर्णय, अर्थसंकल्पीय भाषणे आणि प्रस्तावांच्या प्रतीही त्यांनी पालकमंत्र्यांना सादर केल्या आहेत.
महागाई आणि वाढलेल्या बांधकाम खर्चाचा विचार करता, पूर्वीचा ५० कोटी रुपयांचा आराखडा अपुरा ठरत असल्याने २०२५-२६ च्या दरसूचीनुसार २०० कोटी रुपयांचा नवीन विकास आराखडा मंजूर करून तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करावा, अशी मागणी साहेबराव पाटील यांनी केली आहे.
यामुळे अमळनेरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, तसेच भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed