अमळनेर बाजार समितीत १.५० कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’; शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकरी भवनाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही किंवा विद्यमान इमारती जीर्ण झाल्या आहेत, त्या ठिकाणी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.
शासन निर्णयानुसार या प्रकल्पासाठी रु. ७५.१८ लाख (५० टक्के) शासन अनुदान दोन समान हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित निधी बाजार समितीने स्वतःच्या स्वनिधीतून किंवा कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर मंजूर होणारी रक्कम प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्यास, त्याच्या ५० टक्के इतकेच शासन अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकरी भवनाच्या बांधकामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार असून त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. तसेच बांधकामाचा प्रगती अहवाल नियमितपणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करणे बाजार समितीस बंधनकारक राहणार आहे. इमारतीची देखभाल, दुरुस्ती, वीज, पाणी, मनुष्यबळ व इतर सर्व खर्च बाजार समितीलाच करावा लागणार असून त्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी दिला जाणार नाही.
या शेतकरी भवनासोबत शेतकऱ्यांसाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन योजना’ अंतर्गत केवळ ५ रुपयांत भोजनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनेत शासनाकडून प्रति भोजन ४० रुपयांचे अनुदान दिले जाणार असून उर्वरित खर्च बाजार समिती उचलणार आहे. तसेच हमाल-मापाडींसाठीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून अमळनेर बाजार समितीचा त्यात समावेश झाला आहे. या मंजुरीसाठी पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याबद्दल बाजार समितीने आभार व्यक्त केले आहेत.
सभापती अशोक पाटील यांची प्रतिक्रिया
बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या दीड कोटींच्या शेतकरी भवनामुळे शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या गरीब व कष्टकरी शेतकरी, महिला आणि पुरुषांना मुक्काम, विश्रांती तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. केवळ ५ रुपयांत भोजनाची सुविधा मिळणार असल्याने अमळनेरसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. या कामासाठी पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”
