आगीत जळाला सभामंडप, पण जिंकला माणुसकीचा धर्म; अमळनेरकरांच्या एकोप्याने भारावले प.पू. प्रसाद महाराज. वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ‘तुमच्या एकोप्यामुळे माझी वारी निर्धास्तपणे सुरू’ – प.पू. प्रसाद महाराज.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर येथील संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानात १ जुलै रोजी रात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सभामंडपाचे मोठे नुकसान झाले. मात्र या दुर्घटनेच्या वेळी धर्म, जात, पक्षीय भेद विसरून हिंदू-मुस्लिम बांधवांसह सर्व समाजघटकांनी एकत्र येत केलेल्या मदतकार्यामुळे सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडल्याची भावना प.पू. प्रसाद महाराज यांनी व्यक्त केली आहे.

सध्या आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या प्रसाद महाराजांनी अमळनेरकरांना उद्देशून भावनिक संदेश दिला. आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, होमगार्ड, नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाडी संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, सेवेकरी आणि हजारो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
अमळनेरसह पारोळा, चोपडा आणि शिरपूर येथील अग्निशमन दलांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. तसेच खाजगी वाहनधारक, स्वयंसेवक आणि नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केला. या सर्वांचे प्रसाद महाराजांनी विशेष आभार मानले आहेत.
मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचेही त्यांनी कौतुक केले. संकटाच्या काळात दाखविलेला एकोपा आणि सामाजिक सलोखा भविष्यातही कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. कोणतेही संकट आले तरी सर्वांनी एकत्रितपणे त्याला सामोरे जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भीषण आगीत सभामंडपाचे मोठे नुकसान झाले असले तरी गाभाऱ्यातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी याला ईश्वरी कृपा मानले आहे. “बरेच काही जळाले, पण देव शाबूत राहिले; यापेक्षा मोठी कृपा कोणती?” अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, मंदिराला आग लागून मोठे नुकसान झाले असतानाही प्रसाद महाराजांनी आपली आषाढी वारी अर्धवट सोडली नाही. ‘आधी पांडुरंग’ या संतपरंपरेतील भावनेला अनुसरून त्यांनी दिंडीचा प्रवास सुरूच ठेवला. यापूर्वी स्वतःच्या मातोश्रींच्या निधनाच्या प्रसंगीही त्यांनी वारी खंडित केली नव्हती. भक्ती, कर्तव्य आणि संतपरंपरेप्रती असलेली त्यांची निष्ठा या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
प्रसाद महाराज म्हणाले…
“वाडी संस्थानला आग लागल्याचे समजताच अमळनेरकरांनी दाखविलेला एकोपा माझ्यासाठी मोठा आधार आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांनी हातात हात घालून जीवाची पर्वा न करता मंदिर वाचविण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधी, वाडी संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, भक्तगण, सेवेकरी आणि मदतीला धावून आलेल्या प्रत्येक नागरिकाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात, त्यामुळे मला कसलीही चिंता नाही. ‘आधी पांडुरंग’ या भावनेने माझी वारी सुरूच राहील. मंदिराची पुनर्बांधणीही आपल्या सर्वांच्या एकोप्याने नक्की उभी राहील.”
