पिळोदे ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी द्या; अन्यथा ७ जुलैपासून उपोषणाचा इशारा.
अमळनेर | आबिद शेख

मौजे पिळोदे ता. अमळनेर येथील ग्रामस्थांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा तसेच गावात अॅक्वा पाणी प्रकल्प सुरू करण्यात यावा, अशी मागणी करत तालुकाध्यक्ष – आदिवासी पारधी विकास परिषद, अमळनेर येथील श्री. अविनाश गोरख पवार यांनी पंचायत समिती अमळनेर यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गावात अनेक वर्षांपासून स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून ग्रामस्थांना वेळेवर शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. याबाबत ग्रामपंचायत बैठकींमध्ये वारंवार अॅक्वा प्रकल्प उभारण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गावात अॅक्वा पाणी प्रकल्प उभारल्यास ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळेल, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील तसेच ग्रामपंचायतीलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावावी, अन्यथा दि. ७ जुलै २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्याचा इशाराही अविनाश पवार यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, तहसीलदार अमळनेर तसेच पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस स्टेशन यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.
