बँक ऑफ बडोदाच्या सुरक्षा रक्षकावर कर्ज मंजुरीत आर्थिक व्यवहाराचे आरोप; व्यवस्थापकांकडे तक्रार.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : बँक ऑफ बडोदा, अभीटे शाखेतील सुरक्षा रक्षक अंबालाल नगराळे यांच्याविरुद्ध कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करत शाखा व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, अंबालाल नगराळे हे बँकेचे कर्मचारी नसून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांनी काही सभासदांना बँकेतून कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत त्यांच्या कडून ५ ते १० टक्के रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्ज प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून आर्थिक देवाणघेवाण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या तक्रारीतील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून संबंधित सुरक्षा रक्षक किंवा बँक प्रशासनाची भूमिका समजू शकलेली नाही. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
