महिला पतंजली योग समितीचा उपक्रम; एलआयसी कॉलनीत महिलांसाठी मोफत योग वर्ग सुरू.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरातील प्रभाग क्र. ८ मधील एलआयसी कॉलनी परिसरात महिला पतंजली योग समितीच्या वतीने महिलांसाठी दररोज मोफत योग वर्गाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कॅन्सर, हृदयविकार, सांधेदुखी, थायरॉईड यांसारख्या विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेक महिलांना नियमित व्यायाम किंवा सकाळी फिरण्यासाठी वेळ मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महिला पतंजली योग समितीने हा आरोग्यदायी उपक्रम सुरू केला आहे.

दररोज सकाळी ५.१५ ते ६.१५ या वेळेत योग समितीच्या अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार, कोषाध्यक्ष रत्ना भदाणे, मीडिया प्रभारी माधुरी पाटील आणि अलका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्ग घेतले जात आहेत.
या उपक्रमासाठी नगरसेविका अपूर्वा चौधरी व जालंदर चौधरी यांनी एलआयसी कॉलनीसाठी दोन योग मॅट उपलब्ध करून दिल्या आहेत. पतंजली योग समिती व एलआयसी कॉलनीच्या सहकार्याने सुरू असलेल्या या मोफत योग वर्गाचा सध्या सुमारे ३५ महिला नियमित लाभ घेत असून महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.
