उन्मळलेले पिंपळ ठरले भाविकांसाठी अडथळा; तातडीने हटविण्याची मागणी.- पाच पावली देवी मंदिरासमोरील उन्मळून पडलेले पिंपळाचे झाड हटविण्याची मागणी.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरातील पाच पावली देवी मंदिरासमोर सुमारे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी उन्मळून पडलेले पिंपळाचे झाड अद्यापही जागेवरच पडून आहे. विशेष म्हणजे याच परिसरात नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही संबंधित यंत्रणेकडून झाड हटविण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मंदिरात दररोज दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र पडलेल्या झाडामुळे मंदिराकडे जाणाऱ्या मार्गात अडथळा निर्माण होत असून भाविकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच परिसराच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
हे उन्मळून पडलेले झाड हटविण्याची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन झाड हटवून परिसर मोकळा करावा, अशी मागणी भाविक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
