अमळनेरातील अनधिकृत शाळांवर कारवाईची मागणी; संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन.
अमळनेर/आबिद शेख

निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही तालुक्यातील एका अनधिकृत शाळेबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यावर प्रभावी कारवाई न झाल्याने शहर व ग्रामीण भागात आणखी काही शाळा सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून काही संस्था पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्ग चालवत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, अनेक पालकांना शाळेची मान्यता व कायदेशीर प्रक्रिया याबाबत पुरेशी माहिती नसल्याने ते अशा शाळांमध्ये मुलांचा प्रवेश घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने UDISE+ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केली असताना काही अनधिकृत शाळांमध्ये ही प्रक्रिया होत नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित शाळांची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही अनधिकृत शाळांविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी केवळ औपचारिक कारवाई झाल्याचा आरोप करत यावेळी केवळ नोटिसा न देता संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अशा शाळा कायमस्वरूपी बंद कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
