Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर/आबिद शेख 


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात आज (२९ जुलै) पासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार सरींसह वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.
याउलट मराठवाड्याच्या दक्षिण भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही दक्षिणेकडील जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३० व ३१ जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ३० जुलै रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांजवळ जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed