Main Story

Editor's Picks

Blog

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर  : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव अमळनेर येथे उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजपूत एकता मंच अमळनेर शहर व ग्रामीण यांच्या वतीने रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.


१७ जून रोजी सकाळी १० वाजता महाराणा चौक येथील स्मारकस्थळी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटनही पार पडले. अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १०० पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
व्याख्यानातून इतिहासाचा वारसा उलगडला
सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह येथे व्याख्यान, विद्यार्थी गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या, तर उद्घाटक म्हणून आमदार अनिल पाटील उपस्थित होते.


यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रा. धर्मसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, नगरसेवक महेश देशमुख, जितेंद्र ठाकूर, व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे, राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, सूरज परदेशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्राचार्य संजय गिरासे यांनी “महाराणा प्रताप : हळदीघाटी युद्धाची साडेचारशे वर्षे व भारत” या विषयावर मार्गदर्शन करत इतिहासाला उजाळा दिला. त्यांनी महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी शेतकी संघ तसेच नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
मिरवणूक व डीजे यांना फाटा देत रक्तदान, विद्यार्थी सन्मान आणि व्याख्यान अशा सामाजिक उपक्रमांद्वारे जयंती साजरी केल्याबद्दल आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी आयोजकांचे कौतुक करत समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजपूत एकता मंच व सर्व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

You may have missed