अमळनेर मतदारसंघात SIR मोहीम प्रभावीपणे राबवा; आ. अनिल पाटील यांचे बूथप्रमुखांना आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथप्रमुखांचा मेळावा उत्साहात; मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यावर भर.

0

 

अमळनेर /आबिद शेख

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून सुटू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीएलए आणि बूथप्रमुखांनी सतर्क राहून विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम यशस्वी करावा. मतदार यादीत नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या वेळेत दुरुस्त करून घ्याव्यात, असे आवाहन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांचा मेळावा नुकताच नर्मदा रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात मतदार यादीचे पुनरीक्षण, संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळातील पक्षाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल भाईदास पाटील होते. प्रारंभी बीएलए तालुका समन्वयक विक्रांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी बूथस्तरावर काम करण्याचे निर्देश

आमदार पाटील यांनी सांगितले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमळनेर मतदारसंघात एकूण ३ लाख २ हजार ९४ मतदार होते. मात्र, सध्याच्या प्रारूप मतदार यादीत २ लाख ५७ हजार मतदारांची नोंद असून, ४४ हजार ३९० मतदारांचे अनमॅपिंग झाल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी २१ हजार ६७० मतदारांच्या नावात किंवा पत्त्यात बदल असल्याचे नमूद करण्यात आले, तर १२ हजार २९६ मतदारांचा शोध लागत नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ३९ हजार ५९५ मतदारांची नावे कायमस्वरूपी वगळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

SIR प्रक्रियेतील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात बूथप्रमुखांनी विशेष लक्ष द्यावे. आपल्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याशी संपर्क साधून मतदारांची नावे तपासावीत आणि आवश्यक असल्यास संबंधित सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. प्रारूप मतदार यादीत पात्र मतदाराचे नाव राहिले असल्यास नमुना क्रमांक ६ भरून नाव नोंदणीसाठी अर्ज करावा, तर मतदार यादीतील तपशिलांमध्ये दुरुस्ती किंवा नियमानुसार आवश्यक बदलांसाठी नमुना क्रमांक ८ चा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बूथ सक्षम करा, पक्ष संघटना मजबूत करा

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी. सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांना संघटनेत स्थान देऊन गाव आणि प्रभाग पातळीवर संघटनात्मक ताकद निर्माण करावी. आगामी काळात निवडणुका असोत किंवा विकासकामे, बूथप्रमुखांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करून पक्षाचा विस्तार करावा, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी मतदारसंघात रस्त्यांचे जाळे, दुष्काळ निवारणासाठी आर्च बंधारे, पाडळसरे धरण आणि उपसा सिंचन योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. अमळनेर शहरातही विविध विकासकामे करण्यात आली आहेत. बाजार समिती, शेतकरी संघ आणि नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींनी जनतेशी संपर्क कायम ठेवावा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

मेळाव्याच्या व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील, पारोळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील (दाजी) आणि माजी पंचायत समिती उपसभापती जितेंद्र पाटील उपस्थित होते.

यावेळी बाजार समिती, शेतकरी संघ आणि नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि बूथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed