अमळनेर अग्निशमन दलाची तत्परता; आगीवर नियंत्रणासह दोन मुक्या प्राण्यांची सुखरूप सुटका अंबऋषी टेकडीवरील कचरा डेपोला आग; दोन ठिकाणी गटारीत अडकलेल्या गोऱ्यांना दिले जीवदान.

0

 

अमळनेर /आबिद शेख 

अमळनेर शहरात गुरुवारी  तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आणण्यासह गटारीत अडकलेल्या दोन मुक्या प्राण्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

अंबऋषी टेकडी परिसरातील कचरा डेपोला गुरुवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजता आग लागली. आगीमुळे परिसरातील झाडांनाही धोका निर्माण झाला होता. नरेश कांबळे यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिल्यानंतर अधिकारी गणेश गोसावी यांनी तातडीने पथकाला घटनास्थळी पाठविले. कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि संभाव्य धोका कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.

दुसरी घटना सकाळी सुमारे ७ वाजता घडली. शहरातील एका गटारीत गोरा अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचून त्याची सुखरूप सुटका केली. त्यानंतर कुसुम भाटिया यांनी या मुक्या प्राण्यावर उपचार केल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, सकाळी सुमारे १०.०५ वाजता लालबाग टॉकीजजवळील गटारीत आणखी एक गोरा अडकल्याची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलासह आरोग्य विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने बचावकार्य राबवून या गोऱ्यालाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या तिन्ही घटनांमध्ये अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी दिनेश बिर्‍हाडे, फारुक शेख, जफर पठाण, सत्यम संदानशिव, आनंद झिंबल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, विजय भोई, आकाश संदानशिव, लखन कंखरे, आकाश बाविस्कर, अजय बिर्‍हाडे, कमलेश पाटील आणि कुंदन सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे आणि मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करणे, या कामगिरीतून अमळनेर अग्निशमन दलाने आपल्या कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय दिला. तीन घटनांमध्ये दाखविलेली तत्परता, समन्वय आणि सेवाभाव यामुळे अग्निशमन दलाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed