टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर अमळनेरच्या सुपुत्राची धाडसी कामगिरी; हवालदार सुभाष गायकवाड यांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ.
अमळनेर /आबिद शेख
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था मजबूत केली. या कठीण प्रसंगी अमळनेरचे सुपुत्र आणि सांताक्रूझ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार सुभाष गायकवाड (दादू पहलवान) यांनी प्रसंगावधान, सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडविले.
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात टायगर श्रॉफ यांचे चालक फिरदोस यांच्या हाताला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर टायगर श्रॉफ स्वतः वाहन चालवत सुरक्षेसाठी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हवालदार सुभाष गायकवाड यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि पुढील सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली.

जखमी चालक फिरदोस यांना सशस्त्र पोलीस बंदोबस्तात नानावटी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्यानंतर हवालदार गायकवाड यांनी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारत रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत सुरक्षा व्यवस्था सांभाळली. पोलिसांच्या बंदोबस्तात टायगर श्रॉफ यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्याच्या प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
टायगर श्रॉफ यांच्या कुटुंबीयांकडून आभार
हवालदार सुभाष गायकवाड यांच्या तत्परतेची आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत टायगर श्रॉफ यांच्या आई आणि बहिणीने त्यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केल्याचे वृत्त आहे.


