अमळनेरमध्ये मक्याच्या शेताला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठे नुकसान टळले नांदगाव रस्त्यालगतची घटना; आजूबाजूच्या मका पिकासह कुरणाला आग लागण्याचा धोका टळला.
अमळनेर | आबीद शेख 
अमळनेर शहरातील नांदगाव रस्त्यालगत मक्याच्या शेताला सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे परिसरातील इतर पिकांचे संभाव्य नुकसान टळले.

प्रकाश नवलं पाटील, ज्ञानेश्वर बळीराम पाटील आणि सुधाकर काशिनाथ पाटील यांच्या मक्याच्या शेतात ही आग लागली होती. घटनास्थळाच्या परिसरात मका पिकासह कुरण असल्याने आग पसरून मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

