पारोळा रस्त्यावरील साई गजानन भागात महिनाभरापासून पाणीगळती पाणीपुरवठा सुरू होताच गळती; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, नागरिकांची कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी

0

अमळनेर/आबिद शेख
अमळनेर शहरातील पारोळा रस्त्यालगत असलेल्या साई गजानन भागातील खालच्या परिसरात गेल्या महिनाभरापासून पाणीगळतीची समस्या सुरू आहे. नळाला पाणीपुरवठा सुरू होताच पाइपलाइनमधून पाणी गळत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र पाहणी होऊनही अद्याप पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा सुरू झाला की गळती सुरू होते आणि पाणीपुरवठा बंद झाल्यानंतरच ती थांबते. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू असलेल्या संपूर्ण कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.


एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने केवळ पाहणी न करता संबंधित पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करावी. पाइपलाइन जुनी किंवा खराब असल्यास ती बदलून नवीन पाइपलाइन टाकावी आणि पाणीगळतीची समस्या कायमस्वरूपी दूर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पाण्याचा अपव्यय थांबवून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी नगरपरिषद प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed