अमळनेरमध्ये पहाटे आयशर वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दलाची तातडीने धाव.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर शहरातील सती माता मंदिराजवळ शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) पहाटे सुमारे ५ वाजेच्या सुमारास साईबाबा ट्रान्सपोर्ट, सुरत यांच्या आयशर वाहनाला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

पहाटेच्या सुमारास वाहनाला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आग विझविण्याची मोहीम सुरू केली. जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे वाहनाला लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.
या अग्निशमन कार्यात फायरमन दिनेश बिराडे, आनंद जुम्मल, आकाश, संदनशिव, फारूक शेख आणि भिक्या पठाण यांनी सहभाग घेतला. जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात आली.
दरम्यान, आयशर वाहनाला आग नेमकी कशामुळे लागली, तसेच या घटनेत किती आर्थिक नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

