खाजगी रुग्णालयांना दरपत्रक मराठी-इंग्रजीत लावणे बंधनकारक; नियमभंग केल्यास कारवाई! उपचार व वैद्यकीय तपासण्यांचे दर स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश.

0

24 प्राईम न्यूज 17 Oct 2026

राज्यातील खासगी रुग्णालयांना उपचार, वैद्यकीय तपासण्या आणि विविध आरोग्यविषयक सुविधांचे दर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन परिपत्रक जारी केले असून, दरपत्रक लपविणाऱ्या किंवा शुल्काबाबत संदिग्धता ठेवणाऱ्या रुग्णालयांवर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा व नियमावली २०२५ मधील अनुसूची ३ नुसार, रुग्णालयांमध्ये उपलब्ध वैद्यकीय सेवा आणि विविध सुविधांचे दर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना उपचारांचा संभाव्य खर्च आधीच समजावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. दरपत्रक स्पष्टपणे उपलब्ध असल्यास वैद्यकीय खर्चाचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच उपचारांच्या बिलावरून निर्माण होणारे गैरसमज आणि अनावश्यक वाद टाळण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे राज्यातील खासगी रुग्णालयांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून उपचार व तपासण्यांचे दर मराठी आणि इंग्रजी भाषेत ठळकपणे प्रदर्शित करावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर संबंधित तरतुदींनुसार कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट संदेश आरोग्य विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed