Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : फरशी रोड पुलावर जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊनही रस्ता अद्याप पूर्ववत करण्यात न आल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुलावर ठिकठिकाणी खड्डे, पसरलेली माती आणि कचऱ्यामुळे धुळीचे लोट उठत असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे आणि धुळीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.


पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी पुलावरील रस्ता खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाची जागा मातीने बुजविण्यात आली; मात्र त्यावर कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा योग्य पद्धतीने डागडुजी करण्यात आलेली नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी तात्पुरती खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात आली असली, तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती पसरलेली आहे.


वाहनांची सतत वर्दळ सुरू असल्याने ही माती हवेत उडून धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी, वाहनचालक, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. सायंकाळच्या वेळी पुलावर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही धुळीचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा आणि अस्वच्छतेमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यामुळे नगरपरिषदेने केवळ तात्पुरती डागडुजी न करता पुलाची तातडीने पाहणी करून खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती, रस्त्याचे डांबरीकरण, माती हटविणे आणि परिसराची विशेष स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

You may have missed