धुळ्यात १२ हजारांच्या लाचेप्रकरणी तलाठी दाभाडे रंगेहात; खासगी इसमालाही अटक.

0

 

 

 

 

धुळे : हायवा वाहनातून वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी धुळे तहसील कार्यालयातील तलाठी दिनेश दिलवर दाभाडे यांच्यासह खासगी इसम जयेश कैलास चौधरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. उर्वरित १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दाभाडे यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणातील तलाठी मृणाल शरद नगराळे हे फरार असल्याची माहिती आहे.

तक्रारदार यांचा बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय असून, त्यांचे हायवा वाहन चालकासह धुळे शहरातील साक्री रोडवरील मोती नाल्याजवळ थांबलेले असताना तलाठी दाभाडे, नगराळे व गायकवाड यांनी वाहनचालकाकडून तक्रारदारांचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर तक्रारदारांना फोन करून चाळीसगाव चौफुलीवर बोलावण्यात आले.


तेथे तलाठी दाभाडे व गायकवाड यांनी, “हायवाने वाहतूक करायची असेल तर २० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा वाहनावर अवैध गौण वाहतुकीचा गुन्हा दाखल करू,” अशी धमकी दिल्याचा तक्रारीत आरोप आहे. घाबरलेल्या तक्रारदाराने त्यावेळी ८ हजार रुपये दाभाडे यांच्याकडे दिले. उर्वरित १२ हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दिली.


तक्रारीच्या पडताळणीदरम्यान तलाठी दाभाडे यांनी तक्रारदाराला खासगी इसम जयेश चौधरी याला भेटण्यास सांगितले. चौधरी याने तलाठी दाभाडे यांच्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली. तसेच दाभाडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून लाचेची रक्कम स्वीकारण्याबाबत खात्री केली.
८ सप्टेंबर रोजी सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी जयेश चौधरी याने तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर चौधरीने मोबाईलवरून तक्रारदाराचे तलाठी नगराळे यांच्याशी लाच स्वीकारल्याबाबत बोलणे करून दिले. पुढे चौधरीने स्वीकारलेली लाचेची रक्कम तलाठी दाभाडे यांच्याकडे दिल्यानंतर दाभाडे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी क्रमांक १ दिनेश दाभाडे व आरोपी क्रमांक ३ जयेश चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले असून, तलाठी मृणाल नगराळे फरार आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी काम पाहिले. तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed