चाळीसगावात ‘मिशन UPSC’ अंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन.
चाळीसगाव/ प्रतिनिधी

चाळीसगाव, दि. १ सप्टेंबर : Quadriya Education and Social Welfare Society संचलित National High School तथा Haji Usman & Hajrabai Mundia Jr. College of Arts, चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘मिशन UPSC’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी जळगाव येथील हारून बशीर सर हे प्रमुख मार्गदर्शक व विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना UPSC, MPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, आवश्यक तयारी, अभ्यासाचे योग्य नियोजन आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांच्या तयारीची सवय लावून घेतल्यास भविष्यात निश्चितपणे यश संपादन करता येते, असे प्रतिपादन हारून बशीर सर यांनी केले. तसेच सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रशासकीय सेवांमध्ये यश मिळविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गुलाम दस्तगीर जनाब साहेब होते. यावेळी संस्थेचे सदस्य हुस्नोदीन जनाब तसेच शाळेचे मुख्याध्यापक सलीम खान सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात अल्लाहच्या पवित्र नावाने तसेच कुरआनमधील आयतीच्या पठणाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना ‘मिशन UPSC’ या उपक्रमामागील उद्देश व त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद सर यांनी प्रभावी व सुंदर पद्धतीने केले. त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध स्पर्धा परीक्षा, अभ्यासपद्धती आणि करिअरच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना प्रशासकीय सेवेकडे प्रेरित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

