गणेशोत्सवाचे विकृतीकरण नव्हे, संस्कृतीकरण करा; डीजेला नकार द्या : एसपी ढिवरे.
अमळनेर/आबिद शेख.
अमळनेर गणेशोत्सवा काळात छोट्या-छोट्या कारणांवरून अनेकदा युवकांवर गुन्हे दाखल होतात. एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर भविष्यातील अनेक संधींचे दरवाजे बंद होऊ शकतात. त्यामुळे उत्सवाच्या काळात संयम बाळगून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. गणेशोत्सवाचे विकृतीकरण नव्हे तर संस्कृतीकरण झाले पाहिजे. यंदा अमळनेरात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प सर्व नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी केले.

गणेशोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर वाणी मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक ढिवरे बोलत होते.
ते म्हणाले की, राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे हा उत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस विभागाने गणेशोत्सवासाठी संपूर्ण तयारी केली असून पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. हा बंदोबस्त नागरिकांच्या तसेच शहर व गावांच्या सुरक्षेसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान केवळ एकच गुन्हा दाखल झाला होता. यंदा एकही गुन्हा दाखल होणार नाही, असा संकल्प सर्वांनी करावा आणि शहरातील शांतता व सलोखा कायम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अमळनेरात १४८, तर मारवडमध्ये ३७ गणेश मंडळांचे विसर्जन
उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी गणेश विसर्जनाच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४८, तर मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३७ गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
अमळनेर तालुक्यात पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अकराव्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा आहे. त्यानुसार विविध दिवसांसाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत चेतन राजपूत, प्रविण पाटील, दिनेश शेलकर, नितीन भदाणे, विक्रांत पाटील, शकील काजी, रणजीत शिंदे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत सूचना मांडल्या. बैठकीचे संचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले.
मद्यपान टाळा; विसर्जन मार्गावर शिस्त राखा
पोलीस अधीक्षक ढिवरे यांनी गणेशोत्सवाच्या काळात मद्यपानापासून दूर राहण्याचे आवाहन केले. मागील काही वर्षांत उत्सवादरम्यान अप्रिय घटना घडून काही नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरात गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेशमूर्ती स्थापनेपूर्वी ती आणण्यासाठी आवश्यक प्रशासकीय परवानगी घेणे, मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रात्री कार्यकर्त्यांची उपस्थिती ठेवणे तसेच पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडेच कानबाई उत्सवादरम्यान काही जणांनी ट्रकवर अशोभनीय पद्धतीने नृत्य केल्याच्या तसेच इतर वाहनांवर पाणी फेकल्याच्या घटनांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या अनुचित वर्तनापासून सर्वांनी दूर राहावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यंदाचा गणेशोत्सव शांतता, संस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा ठरावा, यासाठी नागरिक व गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले.

