महाराष्ट्राच्या प्रारूप मतदार यादीतून २ कोटी ६ लाख मतदारांची नावे वगळली १७ लाख दुबार नोंदी; ३४ लाख मृत मतदारांचा समावेश वगळण्यात आला.

0

24 प्राईम न्यूज 1 Sep 2026

 

 

निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. जुन्या मतदार यादीतील तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. ही संख्या एकूण मतदारांच्या सुमारे २१.१४ टक्के इतकी आहे.

मात्र, वगळलेल्या मतदारांमध्ये सुमारे १७ लाख मतदारांची दुबार नोंदणी असल्याचे समोर आले आहे. या मतदारांची नावे एकाच ठिकाणी कायम ठेवण्यात आल्याने प्रत्यक्षात वगळल्या गेलेल्या मतदारांची संख्या सुमारे १ कोटी ९० लाख इतकी असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे.

Oplus_131072

याशिवाय, सुमारे ३४ लाख मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मृत आणि दुबार नोंदी वगळता प्रत्यक्षात सुमारे १ कोटी ५६ लाख मतदार प्रारूप यादीबाहेर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
पात्र मतदारांना पुन्हा नाव नोंदविण्याची संधी
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना पुन्हा नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदारांना मुख्य निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर माहिती तपासता येणार आहे.
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांसह १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना प्रपत्र-६ द्वारे नाव नोंदणी करता येणार आहे.
मतदार यादीतील एखाद्या नावाबाबत आक्षेप असल्यास प्रपत्र-७, तर नाव, पत्ता, वय किंवा लिंगामध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रपत्र-८ भरता येणार आहे.
जुळवणी न झालेल्या मतदारांना नोटिसा
२००२ ते २००४ मधील जुन्या मतदार यादीशी जुळवणी न झालेल्या तसेच तार्किक विसंगती आढळलेल्या मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाईल.
दावे, हरकती आणि नोटिसांवरील सर्व कार्यवाही २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
विविध कारणांमुळे नावे वगळली
गणना प्रपत्र प्राप्त न होणे, संबंधित पत्त्यावर मतदार गैरहजर असणे किंवा सापडून न येणे, स्थलांतर, मृत्यू, अन्यत्र मतदार म्हणून नोंदणी, दुबार नोंदणी तसेच गणना प्रपत्र भरण्यास नकार देणे आदी कारणांमुळे अनेक मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. अशा मतदारांची कारणांसह यादीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एसआयआरपूर्वी महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. त्यापैकी प्रारूप मतदार यादीत ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांचा, म्हणजेच ७८.८६ टक्के मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रारूप यादीत ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ पुरुष, ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० महिला तसेच ३ हजार ८७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed