माहेरच्या आठवणींना पारिजाताचा सुगंध! ‘माहेरचा पारिजात’चा भावपूर्ण समारोप; माहेरवाशिणींच्या ओटीत पैठणी, फराळ आणि प्रेमाची भेट.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : माहेर म्हणजे केवळ एक वास्तू नव्हे, तर आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेली मायेची ऊब, आठवणींचा सुगंध आणि आपलेपणाची अखंड सावली. याच भावविश्वाला पारिजाताच्या सुगंधाची जोड देत अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे श्री मंगळग्रह मंदिरात अमळनेरकर माहेरवाशिणींसाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘माहेरचा पारिजात’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात समारोप झाला.

पारिजातकाचे रोप हातात घेताच अनेक माहेरवाशिणी भावूक झाल्या. ‘माहेरची आठवण केवळ मनात नाही, तर अंगणातही फुलवायची’ या भावनेतून त्यांनी पारिजातकाचे रोप आपल्या घरी लावून पुढील दोन वर्षे त्याचे मनापासून संगोपन करण्याचा संकल्प केला. त्यामुळे या उपक्रमाची सांगता केवळ एका कार्यक्रमाचा शेवट न ठरता, माहेरच्या नात्यांना निसर्गाच्या माध्यमातून जपण्याचा नवा संकल्प ठरला.

यानंतर सर्व माहेरवाशिणींनी एकत्रितपणे अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. निरोपाची वेळ जवळ येताच एकमेकींना आलिंगन देत, डोळ्यांत आठवणींचे पाणी आणि चेहऱ्यावर माहेरच्या समाधानाचे हास्य घेऊन त्यांनी या अनोख्या उपक्रमाला भावनिक निरोप दिला.
दरम्यान, ‘माहेरचा पारिजात’ उपक्रमासाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सलग तीन दिवस करण्यात आलेल्या सेवारूपी विशेष सहकार्याचे माहेरवाशिणींनी मनापासून कौतुक केले. आयोजनातील आपुलकी, सेवाभाव आणि प्रत्येक क्षणात जाणवणारी माहेरची ऊब यामुळे हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.
माहेरची ओटी भरली, आठवणींची शिदोरी बांधली आणि अंगणात पारिजात रुजवला, अशा भावस्पर्शी वातावरणात ‘माहेरचा पारिजात’चा तीन दिवसीय प्रवास पूर्ण झाला.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे व कोशाध्यक्षा प्रा. सौ. शीलाताई पाटील, तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त, सेवेकरी आणि कार्यकारी मंडळातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


