अमळनेर मुस्लिम कब्रस्तानात अल खिदमत ट्रस्टतर्फे २५ वृक्षांची लागवड पर्यावरण संवर्धनाचा संदेश; लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग.

0

अमळनेर /आबिद शेख
अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या वतीने अमळनेर येथील मुस्लिम कब्रस्तान परिसरात २५ वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून परिसर हिरवागार करण्यासोबतच समाजात पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

या वृक्षारोपण उपक्रमास अमळनेर मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे हाजी सत्तार भाया साहब तसेच अल खिदमत ट्रस्ट, अमळनेरचे सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व सदस्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

विशेष म्हणजे या उपक्रमात लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुलांच्या हातून वृक्षारोपण करून घेत त्यांना झाडांचे मानवी जीवनातील महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण तसेच भविष्यातील पिढीसाठी हिरवाई जपण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


“आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली जीवनाची भेट आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. मुस्लिम कब्रस्तान परिसर अधिक हिरवागार व सुंदर करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed