आषाढी एकादशीनिमित्त ‘प्रति पंढरपूर’ अमळनेरात भक्तीचा महासागर; संत सखाराम महाराज वाडीत हजारो भाविकांची गर्दी.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडीत शुक्रवारी पहाटेपासूनच भक्तीचा महासागर उसळला. शहरासह ग्रामीण भागातील हजारो वारकरी दिंड्या, पालख्या, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात वाडीत दाखल झाले. “विठ्ठल… विठ्ठल…”, “ज्ञानोबा-तुकाराम” या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.


पहाटेपासूनच संत सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. विविध गावांतून आलेल्या दिंड्यांमधील वारकरी भगव्या पताका फडकावत आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करत भक्तिरसात तल्लीन झाले होते.
मुख्य मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी वाळवंटातील संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेत मनोभावे पूजा-अर्चा केली. दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.
यात्रेनिमित्त वाडी परिसरात पूजेचे साहित्य, फुले, हार, प्रसाद, खेळणी तसेच विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांची मोठी रेलचेल होती. खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने संपूर्ण परिसर यात्रेच्या उत्साहाने गजबजून गेला.
“आमच्यासाठी हेच पंढरपूर असून येथेच विठ्ठलाचे दर्शन झाल्याची अनुभूती मिळते,” अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या. संत सखाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सुख-समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली.
यंदाच्या आषाढी एकादशीचे विशेष आकर्षण म्हणजे रंगोली कलाकार नितीन भदाणे यांनी साकारलेली भव्य रांगोळी ठरली. काही दिवसांपूर्वी आगीत नुकसान झालेल्या वाडीच्या सभामंडपाचे वास्तवदर्शी चित्रण त्यांनी रांगोळीतून साकारत वाडीच्या पुनर्बांधणीचा संदेश प्रभावीपणे मांडला. या कलाकृतीचे भाविकांनी भरभरून कौतुक केले आणि अनेकांनी रांगोळीसमोर छायाचित्रे काढून हा क्षण संस्मरणीय केला.
दिवसभर विठ्ठलनामाचा अखंड गजर, वारकरी संप्रदायाचा उत्साह आणि हजारो भाविकांची उपस्थिती यामुळे संत सखाराम महाराज वाडी भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाली. आषाढी एकादशीनिमित्त अमळनेरचे “प्रति पंढरपूर” हे बिरूद यंदाही सार्थ ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed