दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर अमळनेर पोलिसांचा धडक अॅक्शन; घरातून ताब्यात घेत चौकीपर्यंत पायी आणले.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर शहरातील गांधीपुरा परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याच्या तक्रारी असलेल्या सराईत गुन्हेगारावर अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धडक कारवाई केली. राजेश एकनाथ निकुंभ (उर्फ दादू धोबी) याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गांधीपुरा पोलीस चौकीपर्यंत पायी आणण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश निकुंभ याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह (भारतीय न्याय संहितेतील संबंधित गंभीर गुन्हे) तसेच इतर विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. तो सध्या जामिनावर असला तरी गांधीपुरा परिसरात नागरिकांना चाकूचा धाक दाखवणे, धमकावणे, मारहाण करणे आणि लूटमारीसारख्या प्रकारांबाबत पोलिसांकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या.


या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता पोलीस पथकाने राजेश निकुंभ याच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला गांधीपुरा पोलीस चौकीत आणून त्याची सखोल तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्याच्याकडे कोणतेही हत्यार आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला कायद्याचे पालन करण्याचा कडक इशारा देत भविष्यात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी समज दिली.
या कारवाईनंतर गांधीपुरा परिसरात पोलिसांचा धाक अधिक वाढल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलीस कठोर भूमिका घेत असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed