अमळनेरात अडकलेल्या हजारो रेल्वे प्रवाशांसाठी रोटरी क्लबसह सामाजिक संस्थांचे सेवाकार्य.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : वापी विभागात आलेल्या पुराच्या संकटामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून मार्ग बदलण्यात आल्याने ट्रेन क्रमांक २९७२ पटना–बांद्रा एक्स्प्रेस अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. या रेल्वेमधील सुमारे एक हजार ते बाराशे प्रवाशांसाठी अमळनेर रेल्वे स्थानकावर जेवणाची तातडीने व्यवस्था करण्यात आली.


अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत अमळनेरमधील विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत प्रवाशांच्या मदतीसाठी हातभार लावला. या सेवाकार्यात रोटरी क्लब अमळनेरनेही सक्रिय सहभाग नोंदवत अन्न वितरणाची जबाबदारी पार पाडली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील व सचिव तथा उपनगराध्यक्ष रोटे. प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबच्या सदस्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केले. रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून स्थानक अधीक्षक अनिल शिंदे व सी.एम.आय. श्री. पांडे यांच्या सहकार्याने अन्न वितरणाचे नियोजन करण्यात आले. तसेच पश्चिम रेल्वेचे माजी ZRUCC सदस्य रोटे. प्रीतपालसिंग बग्गा यांच्या सूचनेनुसार व प्रयत्नातून या उपक्रमाला गती मिळाली.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर रोटरी क्लब अमळनेरसह इतर सेवाभावी संस्थांनी तत्काळ प्रतिसाद देत प्रवाशांपर्यंत जेवण पोहोचविले. पुरामुळे प्रवासात अडकलेल्या प्रवाशांना वेळेवर अन्न मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या सेवाकार्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रकल्प प्रमुख रोटे. प्रीतपालसिंग बग्गा यांच्यासह रोटे. अभिजीत भांडारकर, रोटे. कीर्तीकुमार कोठारी, रोटे. रोहित सिंघवी, रोटे. प्रतीक खंडेरिया, रोटे. धीरज अग्रवाल, रोटे. किशोर लुल्ला, रोटे. ईश्वर सेनानी, रोटे. राजेश बेदमुथा, रोटे. सनी कोठारी तसेच रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी अमळनेरमधील विविध सामाजिक संस्था, नागरिक आणि स्वयंसेवकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या सेवाकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed