धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; एसटी बस, आयशर व ट्रालाची समोरासमोर धडक, आठ जण गंभीर जखमी.
24 प्राईम न्यूज 25 Jul 2026

धरणगाव : धरणगाव-जळगाव मार्गावरील श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस, आयशर मालवाहू वाहन आणि खडीने भरलेल्या ट्राला यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की तिचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू गेला. अपघातानंतर खडीने भरलेला ट्राला रस्त्यावर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर आगाराची एमएच-२० बीएल-२७३६ क्रमांकाची एसटी बस जळगावहून शिरपूरकडे जात होती. त्याचवेळी खडीने भरलेला ट्राला धरणगावच्या दिशेने मार्गस्थ होता, तर एमएच-१८ बीझेड-३२३२ क्रमांकाचा आयशर धरणगावहून जळगावकडे येत होता. श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ तिन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय पाटील, हवालदार सत्यवान पवार, नितीन पाटील, संदीप पाटील तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत जखमींना रुग्णालयात हलवले. तसेच क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आठ जण गंभीर जखमी झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास धरणगाव पोलीस करीत आहेत.
