कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक (आधार) पाटील यांच्याकडून तालुकाभर स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वितरण.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये साजरी करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेरचे सभापती अशोक (आधार) पाटील यांनी तालुकाभर स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत अशोक (आधार) पाटील यांनी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, प्रांताधिकारी कार्यालय तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांना प्रत्यक्ष भेट देऊन स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे व इतर सहकारी उपस्थित होते.


याशिवाय तालुक्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच विविध संस्थांना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमा सप्रेम भेट म्हणून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रतिमेसोबत देण्यात आलेल्या पत्राद्वारे संबंधित कार्यालये व संस्थांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्व. अजितदादा पवार यांची जयंती आदरपूर्वक व उत्साहात साजरी करावी, असे आवाहन अशोक (आधार) पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या विकासात, कृषी क्षेत्रात, प्रशासनात तसेच अमळनेर परिसरातील विविध विकासकामांमध्ये स्व. अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाची आठवण कायम राहावी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अशोक (आधार) पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे तालुकाभर विविध स्तरांतून स्वागत व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed