इतरांच्या घरात उजेड देणारा महावितरणचा कर्मयोगी कायमचा मालवला; कर्तव्य बजावताना शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : जनतेच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी दिवस-रात्र, पाऊस-वादळाची पर्वा न करता काम करणाऱ्या महावितरणच्या कर्तव्यदक्ष कर्मचारी शरद गोसावी यांचे आज अमळनेरमध्ये वीज दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने महावितरण कर्मचारीवर्गासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

आज भगवा चौक परिसरात शरद गोसावी हे आपल्या सहकाऱ्यांसह वीज दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक घडलेल्या दुर्घटनेत ते विजेच्या खांबावर काही मिनिटे लटकलेल्या अवस्थेत दिसले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, त्यानंतर ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेचे नेमके कारण अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसात आर. के. नगर परिसरातील तिरपा झालेला वीजवाहिनीचा खांब आणि रोहित्र दुरुस्त करून नागरिकांच्या घरात पुन्हा प्रकाश आणणारे शरद गोसावी आज कर्तव्य बजावत असतानाच काळाच्या पडद्याआड गेले. इतरांच्या आयुष्यात उजेड निर्माण करणारा हा कर्मयोगी आज स्वतःच कायमचा निघून गेला.
महावितरणचे कर्मचारी पाऊस, वादळ, रात्र अथवा कोणतीही आपत्ती असो, अखंड वीजपुरवठा सुरू राहावा यासाठी जीवाची पर्वा न करता काम करत असतात. शरद गोसावी यांचे निधन हे केवळ एका कर्मचाऱ्याचे निधन नसून समाजसेवेची निष्ठा जपणाऱ्या एका कर्मयोग्याची अपूरणीय हानी आहे.
कर्तव्याला जीवनापेक्षाही मोठे मानणाऱ्या शरद गोसावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
