मतदार यादी विशेष पुनरिक्षणाबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कडक सूचना; प्रत्येक घरी BLO ची भेट अनिवार्य.

0

24 प्राईम न्यूज 20 Juli 2026


मुंबई, दि. 19 जुलै : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR 2026) मोहिमेला अधिक प्रभावी व पारदर्शक करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. या संदर्भातील आदेश 19 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम सुरू असून, सुधारित वेळापत्रकानुसार 8 ऑगस्ट 2026 पर्यंत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रत्येक मतदाराच्या घरी BLO ने किमान एकदा भेट देणे बंधनकारक आहे. एखादे घर बंद आढळल्यास त्या ठिकाणी किमान तीन वेळा भेट देऊन त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहील.
शहरी भागात काही ठिकाणी BLO एकाच ठिकाणी बसून अर्ज भरून घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. मतदारांचा अचूक पत्ता मिळविण्यासाठी मतदान केंद्र, सोसायटी परिसर किंवा सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता कॅम्प घेता येईल; मात्र त्यानंतर संबंधित मतदाराच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी करूनच गणना प्रपत्र भरावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या घटनांची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आदेशात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राजकीय पक्षांचे नेते BLO किंवा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊ शकत नाहीत तसेच त्यांना कोणतेही निर्देश देऊ शकत नाहीत. निवडणूक प्रक्रिया केवळ निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखालीच पार पडली पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कमी प्रगती असलेल्या BLO आणि सुपरवायझर यांचा नियमित आढावा घ्यावा, तसेच सर्व BLO, विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनाही (BLA) प्रशिक्षण देऊन हरवलेल्या अथवा सापडत नसलेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मतदार पुनरिक्षणाबाबत सामाजिक माध्यमे किंवा प्रसिद्धी माध्यमांतून चुकीची माहिती प्रसारित झाल्यास संबंधित जिल्हा प्रशासनाने त्वरित प्रसिद्धीपत्रक किंवा पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच अधिकृत सोशल मीडिया माध्यमांतून योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा नियमित आढावा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून घेतला जाणार असून, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी या कामात कोणतीही हलगर्जी होऊ न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed