रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब अमळनेरतर्फे पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम शाळा परिसरातील रोटरी सभागृहात आयोजित करण्यात आलेली भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अमळनेर शहरासह परिसरातील विविध शाळांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत आपल्या कल्पकतेचा आणि कलाविष्काराचा प्रभावी आविष्कार सादर केला.


स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शिरपूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रल्हाद सोनार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी चित्रकला ही केवळ कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. सर्जनशील विचार, कल्पनाशक्ती आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या बळावर विद्यार्थी मोठे यश संपादन करू शकतात, असे त्यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेमध्ये इयत्तेनुसार विविध विषय देण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव, देशप्रेम, निसर्ग, स्वच्छता तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि आशयपूर्ण चित्रे साकारली. रंगसंगती, कल्पकता आणि विषय मांडणीच्या आधारे परीक्षकांनी चित्रांचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली.
स्पर्धेचे नियोजन देवांग शाह आणि डॉ. शरद बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पालवे यांनी केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सुप्त प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळते, असे सांगितले. सचिव प्रशांत निकम यांनी सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवांग शाह, महेश पाटील, डॉ. शरद बाविस्कर, किर्ती कोठारी, पूनम कोचर, रोहित सिंघवी, सनी कोठारी, सचिन कोठावडे, ईश्वर सैनानी, अजय रोडगे, प्रतीक जैन, चेलाराम सैनानी यांच्यासह रोटरी क्लबच्या सदस्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रताप हायस्कूलचे डी.एन. पालवे, सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे दिलीप पाटील, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या मयुरी बनसोले व प्रियंका परदेशी, न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या गायत्री बारी, अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे गणेश लोहार तसेच डी.आर. कन्या शाळेचे किरण पाठक यांनी विशेष सहकार्य केले.
स्पर्धेतील ४०० हून अधिक सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब अमळनेरतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed