जि एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,

0

अमळनेर/ आबिद शेख 


अमळनेर -येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर होते. खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल, प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए.बी. जैन तसेच संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त, संचालक, विविध शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी शाळा ही केवळ शिक्षणाची नव्हे तर संस्कारांचीही पवित्र भूमी असल्याचे सांगितले. मेहनत, कष्ट आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावर विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. जी.एस. हायस्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त करत शाळा व संस्थेच्या विकासासाठी नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांनी शाळेला ₹५१ हजारांची देणगी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला. तसेच वर्धापन दिनाचा विशेष लोगो फुग्यांच्या सहाय्याने मान्यवरांच्या उपस्थितीत आकाशात सोडण्यात आला. शाळेचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील यांनी सादर केला. अध्यक्षांचा परिचय उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे यांनी करून दिला, तर प्रास्ताविक पर्यवेक्षक एस. आर. शिंगाणे यांनी केले.
यावेळी एसएससी परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ए. ए. पाटील यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक के. पी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed