साने गुरुजींच्या विचारांना कृतीची जोड; श्रमदानातून स्मारक परिसरातील रस्त्याची डागडुजी.

0

आबिद शेख/ अमळनेर 
अमळनेर : साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. ११) लोकसहभागातून साने गुरुजी स्मारक परिसरातील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. खराब झालेल्या रस्त्याची समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी पुढाकार घेत श्रमदानातून हा उपक्रम राबविला.


साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत होता. रस्त्यावरील खड्डे, चिखल व असमतोल मार्गामुळे परिसरातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शासन व लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासन मिळाल्याने लोकसहभागातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या उपक्रमात रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मुरूम टाकणे तसेच रस्ता समतल करण्याचे काम करण्यात आले. विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत साने गुरुजींच्या समाजसेवा आणि मानवतेच्या विचारांना कृतीतून आदरांजली वाहिली.
या श्रमदान उपक्रमासाठी स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील, अमेय मुंदडा, डॉ. विकास हरताळकर, नगरसेवक अनिल महाजन, चेतन सोनार, माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्यासह अनेक नागरिकांनी सहकार्य केले. लोकसहभागाच्या माध्यमातून रस्त्याची समस्या मार्गी लावण्याचा हा प्रयत्न परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed