चौबारी ग्रामपंचायतीत मोठा कारभाराचा घोळ १ ते ३३ नमुने गायब; तत्कालीन ग्रामसेवक चार्ज सोडण्यास टाळाटाळ नवे ग्रामसेवक अडचणीत. – ग्रामस्थांना दाखले मिळत नसल्याने त्रस्त..

0
New-Doc-02-28-2026-23.40.jpg

आबिद शेख अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील चौबारी ग्रामपंचायतीत गंभीर प्रशासकीय अनियमितता उघडकीस आली असून ग्रामपंचायतीचे अत्यंत महत्त्वाचे १ ते ३३ क्रमांकाचे नमुनेच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नव्याने बदली होऊन आलेले ग्रामपंचायत अधिकारी वासुदेव हरिभाऊ मारवडकर यांना आजतागायत पूर्ण अधिकृत चार्ज मिळालेला नसल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे.
यामुळे नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले, उतारे तसेच इतर शासकीय कागदपत्रे मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.


मारवडकर यांनी यासंदर्भात पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी अहवाल सादर केला आहे.
बदली झाली, पण चार्ज नाही
३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार तत्कालीन ग्रामसेवक नितीन मराठे यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी वासुदेव मारवडकर यांची नियुक्ती झाली.
मात्र ५ जानेवारी २०२६ रोजी विस्तार अधिकारी कठडे अण्णा यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयातील कपाट उघडून पाहणी करण्यात आली असता,
➡️ नमुना क्रमांक १ ते ३३
➡️ नमुना क्र. ८
➡️ नमुना क्र. ९ (दाखले नोंदवही)
➡️ जन्म-मृत्यू नोंदणी रजिस्टर
हे सर्व महत्त्वाचे अभिलेख गायब असल्याचे आढळून आले.
नवीन कुलूप, पण जुने रेकॉर्ड गायब
या प्रकारानंतर विस्तार अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यालयाला नवीन कुलूप लावण्यात आले आणि नवीन दप्तर सुरू करून कामकाज हाती घेण्यात आले.
१२ जानेवारी २०२६ रोजी ग्रामसभा घेऊन बँक खात्यांवरील सह्या देखील बदलण्यात आल्या.
तरीही गेल्या ८ ते १० वर्षांपासून नमुना क्र. ९ उपलब्ध नसल्याने नागरिकांना दाखले देणे अशक्य बनले आहे.
ग्रामस्थांची गैरसोय
महत्त्वाच्या नोंदवही नसल्यामुळे नागरिकांना —
▪️ जन्म-मृत्यू दाखले
▪️ रहिवासी दाखले
▪️ इतर शासकीय प्रमाणपत्रे
मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
चौकशीची मागणी
मारवडकर यांनी संबंधित नमुने तात्काळ उपलब्ध करून देण्याची तसेच पूर्ण चार्ज हस्तांतरण करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनीही या प्रकरणाची चौकशी करून ग्रामपंचायतीचे नियमित कामकाज सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोट
“चौबारीचे तत्कालीन ग्रामसेवक नितीन मराठे यांची इतरत्र बदली झाली आहे. मात्र त्यांनी अद्याप ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दप्तर नव्या ग्रामसेवकांकडे हस्तांतर केलेले नाही. तोंडी तसेच लेखी स्वरूपात मागणी करूनही पूर्तता झालेली नाही. लवकरच त्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जाणार आहे.”
— एन. आर. पाटील
गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed