६ वर्षांच्या दोन चिमुरड्यांचा कडक रोजा; नंदुरबारमध्ये प्रेरणादायी उदाहरण..
नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार : ज्या वयात मुले खेळण्यात रममाण असतात, त्या वयात नंदुरबारमधील दोन चिमुरड्या मुलींनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. अवघ्या ६ वर्षांच्या अरीबा दानिश अहमद बागवान आणि कशफ अश्फाक शेख यांनी सलग दोन दिवस कडक रोजा पाळून अल्लाहची इबादत केली. त्यांच्या या जिद्दीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

श्रद्धा, संयम आणि शिस्तीचे दर्शन
लहान वय असूनही अरीबा आणि कशफ यांनी दिवसभर अन्न-पाण्याचा त्याग करून पूर्ण संयमाने रोजा पाळला. त्यांनी पाच वेळची नमाज अदा करत धार्मिक शिस्तही जपली. रोजा म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर संयम, कृतज्ञता आणि चांगल्या आचरणाची शिकवण देणारी साधना आहे. या दोन्ही चिमुरड्यांनी ही शिकवण लहान वयातच आत्मसात करून समाजासमोर प्रेरणादायी संदेश दिला आहे.
सामाजिक संस्थेकडून गौरव
या उल्लेखनीय प्रयत्नांचे कौतुक म्हणून ‘इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन’तर्फे विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज भाई बागवान यांनी दोन्ही मुलींचे पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच रोख पारितोषिक व इफ्तारसाठी मिठाईचे बॉक्स देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास जनसेवा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रुकसाना बागवान, सामाजिक कार्यकर्ते सैयद मकसूद, फाउंडेशनचे सचिव दानिश अहमद बागवान, तसेच हलीमा अश्फाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन चिमुरड्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या जिद्दीची सर्वत्र चर्चा होत आहे.
