जितेंद्र ठाकूर यांची शैक्षणिक संकुलांना भेट; विकासाच्या त्रिसूत्रीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी आपल्या प्रचार मोहीमेला आणखी वेग देत २६ नोव्हेंबर रोजी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच कर्मचारी वर्गाशी संवाद साधत शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले.
शहरभरात “विकासाचा झंझावात” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकूर यांच्या प्रचार मोहीमेला गृहभेटी, कॉर्नर सभा आणि थेट संवाद उपक्रमांमुळे मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांसाठी त्यांनी मांडलेली विकासाची त्रिसूत्री— उत्कृष्ट पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुरक्षित शहर— या तिन्ही अंगांवर ते नागरिकांना सविस्तर माहिती देत आहेत.
शैक्षणिक संकुलांतील भेटीदरम्यान त्यांनी कौशल्याधारित उपक्रम, आधुनिक शिक्षणसुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भर दिला. विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या संवादात तरुणांच्या रोजगाराभिमुख प्रशिक्षणाबाबतही त्यांनी आश्वासन दिले. उपस्थित शिक्षक आणि पालकांनी शिक्षणविषयक गरजा, अपेक्षा आणि अडचणी ठाकूर यांच्यासमोर मांडल्या.
या दौऱ्यात त्यांनी ओम शांती केंद्रालाही भेट दिली. येथे महिला भगिनी, कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना, सूचनांना आणि गरजांना त्यांनी सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद दिला. महिलांसाठी स्वतंत्र उपक्रम, आरोग्यविषयक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि समर्पित महिला विकास उपक्रम यासंदर्भात त्यांनी ठोस नियोजन मांडले.
तसेच, अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचा संकल्पनामा सादर करत सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. “एकजूट हेच शहर विकासाचे बळ” असे प्रतिपादन करत शहराच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अमळनेरमध्ये नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून जितेंद्र ठाकूर यांचा जनसंपर्क वाढत असून आगामी निवडणुकीत त्यांना वाढता जनसमर्थन लाभत असल्याचे दृश्य या भेटीदरम्यान प्रकर्षाने दिसून आले.
