लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ भीषण बॉम्बस्फोट — ८ ठार, २४ हून अधिक जखमी; दिल्ली, मुंबई आणि यूपीमध्ये हाय अलर्ट…
24 प्राईम न्यूज 11Nov 2025

नवी दिल्ली :देशाची राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक-१ जवळ सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ‘ह्युंदाई आय-२०’ कारमध्ये जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून २४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्फोटानंतर लागलेल्या आगीत बाजूला उभ्या असलेल्या तीन कार पूर्णपणे जळून खाक झाल्या. घटनास्थळी भीषण दृश्य पाहायला मिळाले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की स्फोट झालेल्या कारचा फक्त सांगाडाच शिल्लक राहिला. काही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले, अशी माहिती ‘सीसीटीव्ही’ फुटेजमधून समोर आली आहे.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या, रुग्णवाहिका आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवून जखमींना रुग्णालयात हलवले. स्फोटाच्या वेळी लाल किल्ला परिसरात मोठी गर्दी असल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले असून प्राथमिक तपासात स्फोटात ‘आयईडी’चा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर दिल्लीसह मुंबई, उत्तर प्रदेश आणि देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
