जळोद येथे जुगार अड्ड्यावर धाड — २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर– अमळनेर विभागीय पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने जळोद येथे पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी डीवायएसपी विनायक कोते यांनी हेडकॉन्स्टेबल प्रमोद बागडे, गणेश पाटील, हितेश बेहरे, शेखर साळुंखे, सुनील जाधव, विजय भोई आणि राहुल पाटील यांना गुप्त माहिती दिली की जळोद शिवारातील पातोंडा रस्त्यावर जुगार खेळला जात आहे. त्यानुसार पथकाने सायंकाळी सापळा रचून छापा टाकला असता, सोमा मच्छीन्द्र वैदू यांच्या घराच्या मागील मोकळ्या जागेत काही जण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची नावे युवराज शिवराम कोळी (४५), सागर युवराज कोळी (२६), सुनील अर्जुन साळवे (४६) आणि गणेश आधार कोळी (५२, सर्व रा. जळोद) अशी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल आणि नऊ मोटारसायकली असा एकूण २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चारही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

