अमळनेर : आबिद शेख

गांधीनगर इस्लामपुरा परिसरात अतिक्रमण कारवाईदरम्यान घरे पाडण्यात आलेल्या कुटुंबांपैकी दोन कुटुंबे अद्यापही उघड्या आकाशाखाली जीवन जगत आहेत. कडक उन्हाचा त्रास तसेच पावसाळ्यात पावसाच्या पाण्याशी सामना करत त्यांचे दैनंदिन जीवन सुरू होते.

या परिस्थितीची दखल घेत अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला. संबंधित कुटुंबांना उन्हापासून आणि पावसापासून तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी प्लास्टिकचे छत (आश्रय व्यवस्था) करून दिली.

या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना काही प्रमाणात आधार मिळाला असून परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. कठीण परिस्थितीत मदतीचा हात पुढे करत माणुसकीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
