अमळनेरच्या सोनल हटकरची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; FIBA आशियाई स्पर्धेत पंच म्हणून निवड.

अमळनेरच्या सोनल हटकरची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; FIBA आशियाई स्पर्धेत पंच म्हणून नि
अमळनेर, दि. ७ जून : अमळनेरसह संपूर्ण खान्देशसाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी येथील कन्या सोनल हटकर हिने केली आहे. कै. सुकलाल डिगंबर पैलवान यांची नात असलेल्या सोनल हटकर हिची श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या १८ वर्षांखालील FIBA आशियाई बास्केटबॉल चॅम्पियनशिप SABA क्वालिफायर २०२६ स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच (Referee) म्हणून निवड झाली होती.

कोलंबो येथील सुगथादासा इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत सोनलने यशस्वीपणे पंचाची भूमिका पार पाडत भारताचा तिरंगा आणि अमळनेरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे अमळनेर शहरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सोनल हटकर हिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचा जाहीर नागरी सत्कार व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारंभ रविवार, ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला असून पैलाड ते मंगलादेवी चौक या मार्गावर मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून समाजसेवक तुळशीराम भाऊ हटकर, पूनम भाऊ हटकर तसेच समस्त हटकर परिवार, अमळनेर यांनी पुढाकार घेतला आहे.
