राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा 24 फेब्रुवारीला विधानभवनावर लक्षवेधी आंदोलनाचा इशारा..
अमळनेर/ आबिद शेख
राज्यातील सुमारे 28,500 ग्रामपंचायतींमध्ये मागील 14 वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुमारे 20,000 संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 24 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथील विधानभवनावर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून राज्यभरातून हजारो संगणक

परिचालक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अमळनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.
ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पांतर्गत संगणक परिचालक ग्रामीण भागातील सुमारे 7 कोटी नागरिकांना ऑनलाइन व ऑफलाइन सेवा देत आहेत. मात्र, गेल्या 14 वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करत असतानाही त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळालेले नाही.
यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची प्रमुख मागणी आहे. शासनाने याबाबत अनेकदा लेखी व तोंडी आश्वासने दिली असली तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. सध्या मिळणारे 10,000 रुपयांचे मानधनही नियमितपणे न मिळता 5 ते 6 महिन्यांचा विलंब होत असल्याने संगणक परिचालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :
यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे.
तोपर्यंत सध्याच्या 10,000 रुपयांच्या मानधनात 7,000 रुपयांची वाढ करून मानधन 17,000 रुपये करण्यात यावे.
संगणक परिचालकांना कायमस्वरूपी नोकरीची सुरक्षा व कंत्राटी कामगारांप्रमाणे सर्व लाभ द्यावेत.
ग्रामपंचायतींना नवीन संगणक, प्रिंटर व आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे.
महिला संगणक परिचालकांना मानधनासह प्रसूती रजा द्यावी.
सर्व संगणक परिचालकांना किमान 50 लाखांचा अपघाती व आरोग्य विमा लागू करावा.
या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यभरातील संगणक परिचालक एकत्र येणार असून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करून संगणक परिचालकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
