धार रस्त्यावर अपघात — दुचाकीस्वार गंभीर जखमी, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :तालुक्यातील धार रस्त्यावरील चिन्मय हॉटेलजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील अंतुर्ली येथील आश्रमशाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले पवन सुभाष पाटील (वय ३९, रा. प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर) हे रोज नोकरीनिमित्त अंतुर्ली-अमळनेर दरम्यान अप-डाऊन करत असतात.

दिनांक २३ रोजी सायंकाळी सुमारास सात वाजता पवन पाटील हे त्यांच्या ओला स्कूटरने अंतुर्लीला जात असताना, धार रस्त्यावरील चिन्मय हॉटेलजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर बाजार समिती संचालक सचिन बाळू पाटील यांनी तत्काळ जखमींना अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेनंतर जखमींचे वडील सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.
