मुख्य रस्त्यावरील तुटलेल्या लोखंडी जाळीमुळे ‘मृत्यूचा सापळा’; नागरिकांचा संताप, नगरसेवकांकडून दुरुस्तीचे आश्वासन.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर शहरातील पैलाड भागातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये संत सखाराम महाराज संस्थानकडून पारोळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मोठ्या नाल्यावर बसवण्यात आलेली लोखंडी जाळी पूर्णपणे तुटल्याने येथे ‘मृत्यूचा सापळा’ निर्माण झाला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी बसवलेली ही जाळी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या ठिकाणी कधीही मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


हा मार्ग शहरातील प्रमुख व रहदारीचा असल्याने दिवसरात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र नाल्यावर बसवलेली जाळी तुटल्यामुळे मोठा खड्डा उघडा पडला असून विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा धोका लक्षात येत नाही. त्यामुळे येथे रोज किरकोळ अपघात घडत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित लोकप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने जाळी दुरुस्त करण्याची मागणी करत इशारा दिला आहे की, वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठ्या संख्येने नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच भविष्यात येथे कोणतीही दुर्घटना झाल्यास त्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील.
याबाबत प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका सौ. पुष्पा पंकज भोई यांनी सांगितले की, “आमच्या प्रभागात लोखंडी जाळी बसवण्यात आली होती. मात्र पुढील पुलाजवळ सुरू असलेल्या कामामुळे संबंधित ठेकेदाराकडून अवजड वाहनांची वाहतूक करण्यात आली आणि त्यामुळे जाळी तुटली. या संदर्भात नगर परिषदेकडे पाठपुरावा करण्यात आला असून लवकरच त्या ठिकाणी नवीन जाळीसह स्पीड ब्रेकर बसवून प्रश्न मार्गी लावण्यात येईल.”
तर नगरसेवक सुयोग ज्ञानेश्वर धनगर यांनी सांगितले की, “अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ही जाळी तुटली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी नगर परिषदेकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच नवीन लोखंडी जाळी बसवण्यात येणार आहे. नागरिकांनी काळजी करू नये.”
दरम्यान, अवघ्या एका महिन्यात लोखंडी जाळी तुटल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता नगर परिषद प्रशासन अपघात होण्यापूर्वीच या समस्येवर उपाययोजना करते की नाही, याकडे संपूर्ण पैलाड भागाचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed