24 प्राईम न्यूज 13 Jun 2026
मुंबई : एसटीच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली.

राज्यात आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता स्मार्ट कार्ड मिळवून त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरात ४ हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत असल्याची माहितीही देण्यात आली.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या विविध प्रवासी सवलती अधिक सुरळीतपणे देणे, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

१ ऑगस्टपूर्वी संबंधित लाभार्थ्यांनी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
