Main Story

Editor's Picks

Blog


अमळनेर : आबिद शेख 
लग्न म्हटले की मोठा खर्च, भव्य सोहळा आणि विविध रीतिरिवाज असा सर्वसाधारण समज आहे. मात्र अमळनेर शहरात शनिवारी याला छेद देत साधेपणाचा आणि सामाजिक संदेश देणारा निकाह पार पडला. पुणे येथील कंत्राटदार नोमान मोहम्मद सैय्यद आणि अमळनेरच्या इस्लामपुरा भागातील रहिवासी डॉ. अल्फिया अख्तर पठाण यांचा निकाह जोहरच्या नमाजनंतर इस्लामपुरा मशिदीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.
विशेष म्हणजे, नवरदेवाचे कुटुंबीय रिश्ता करण्यासाठी अमळनेर येथे आले होते. दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा होऊन परस्पर सहमती झाल्यानंतर मोठा समारंभ किंवा अनावश्यक विधी न करता त्याच वेळी निकाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रिश्ता करण्यासाठी आलेले कुटुंब निकाह करूनच परतले.

 

 

या निकाहासाठी कोणताही भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. अनावश्यक खर्च, दिखावा आणि अवाजवी रीतिरिवाजांना फाटा देत केवळ २० ते २५ जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला. डॉक्टर नवरी आणि कंत्राटदार नवरदेव असूनही दोन्ही कुटुंबांनी साधेपणाला प्राधान्य देत समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला.

जोहरच्या नमाजनंतर मशिदीत निकाह.


शनिवारी जोहरच्या नमाजनंतर इस्लामपुरा मशिदीत निकाहाची प्रक्रिया पार पडली. मौलवी अजहर यांनी निकाह पढविला. यावेळी त्यांनी समाजात साधेपणाने निकाह करण्याची गरज व्यक्त केली.
साधेपणाने निकाह करण्याचे आवाहन
मौलवी अजहर यांनी सांगितले की, पैगंबर मोहम्मद साहेबांनी निकाह साधा आणि सुलभ करण्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे निकाहाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च, दिखावा आणि अवाजवी रीतिरिवाज टाळले पाहिजेत. साधेपणाने निकाह केल्यामुळे कुटुंबांचा पैसा आणि वेळ वाचतो, तसेच समाजातही सकारात्मक संदेश जातो.
साध्या निकाहातून समाजाला सकारात्मक संदेश
डॉक्टर नवरी आणि कंत्राटदार नवरदेव असतानाही दोन्ही कुटुंबांनी कोणताही दिखावा न करता मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत निकाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, रिश्ता करण्यासाठी आलेले कुटुंब निकाह करूनच परतल्याने हा निकाह शहरात चर्चेचा विषय ठरला.
अनावश्यक खर्च आणि दिखावा टाळून साधेपणाने विवाह करता येतो, असा सकारात्मक संदेश या निकाहातून देण्यात आला आहे.

You may have missed